परतवाडा शहरामध्ये प्रतिष्ठीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

लाखोंचा मुद्देमाल जप्त;आठ जणांना घेतले ताब्यात

अचलपूर (प्रतिनिधी)- परतवाडा शहरातील टिंबर डेपो परिसरातील एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास धाड टाकून जुगाराचा डाव उधळला. येथून आठ लब्धप्रतिष्ठितांना ताब्यात घेण्यात आले, तर चार ते पाच जण पळून गेले. रोख रक्कम, मोबाइल, वाहने असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे जुळ्या शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, टिंबर डेपो परिसरातील शिवाजी चित्रकार यांच्या घरावर शनिवारी सायंकाळी परतवाडा पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली. ठाणेदार संदीप चव्हाण यांनी पोलिस चमूचे नेतृत्व केले. शहरातील प्रतिष्ठित जुगार खेळताना आढळले. तथापि, ज्यांचे घर आहे, ते प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. पोलिसांनी या ठिकाणाहून ८६ हजार शंभर रुपये रोख,४४ हजाराचे मोबाईल तसेच १ लाख २० हजाराचे तीन दुचाकी असा अडीच लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय नरेश किसनराव लाडेकर (४२, रा. गाडगेनगर, अमरावती), अजय लीलाराम घमेले (४९, रा. कासदपुरा, अचलपूर), नरेश मदनलाल अग्रवाल (४८, रा. सदर बाजार, परतवाडा), सुरेश जानकीलाल अग्रवाल (३९, रा. कविठा स्टॉप, परतवाडा), रिजवान रफीक पठाण ३६, रा. टवलार, ता. अचलपूर), धीरज सेठी (४४,चावलमंडी, अचलपूर), विजय बबनराव उदापूरकर (३४, रा. गुप्तानगर, कांडली), दिनेश ऊर्फ पायल बबनराव दुरतकर (३०, रा. एकतानगर, परतवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदीप चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर,सुधीर राऊत ,उमेश सावरकर,मनिष काटोलकर ,विवेक ठाकरे ,जितेश बाबिल,घनश्याम कीरोले यांनी केली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top