अमरावतीच्या व्यापाऱ्याची 80 लाखांची रोकड अकोल्यातून लंपास

आरोपीला मध्यप्रदेशातून ठोकल्या बेड्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 79 लक्ष रुपयांची रोकडही केली जप्त

अकोला :- पातूर येथील क्वालिटी ढाब्यासमोरून एका लक्झरी मधील अमरावती येथील व्यापाऱ्याची 80 लाख रुपये रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या मनावर तालुक्यातून बेड्या ठोकल्या तर या घटनेतील दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. विनोद विश्राम चव्हाण ( वय 19 वर्ष ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर रहेमान उर्फ पवली गफूर खान असे फरार आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सविस्तर असे की, 26 नोव्हेंबर रोजी अमरावती येथील रहिवासी असलेले व्यापारी राजू चेलाजी प्रजापती हे 80 लाख रुपयांची रोकड घेऊन एका लक्झरी मधून मुंबई येथे खाजगी कामानिमित्त निघाले होते. सदर लक्झरी बस ही पातूर येथील क्वालिटी ढाब्यावर थांबली असता फिर्यादी राजू प्रजापती हे लघुशंकेकरिता ढाब्यावर उतरले.

यावेळी त्यांनी ढाब्यावरुन पाण्याची बॉटल सुद्धा घेतली आणि बस मध्ये आले असता त्यांना रोकड असलेली बॅग आढळली नाही. बॅग न आढळल्याने त्यांनी लगेचच पातूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पातूर पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भांदवी कलम 379 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी याप्रकरणी लगेच तपास पथक गठीत करीत संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा घेत तपासाची चक्रे फिरविली. तपासाची चक्रे फिरवितात पोलिसांना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक बाबींवरून आरोपी निष्पन्न झाले. सदर माहितीच्या आधारे तपास पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले आणि त्यांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या मनावर तालुक्यातील विनोद विश्राम चव्हाण ( वय 19 वर्ष) यास ताब्यात घेतले, त्याची विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे कबुलले. यावेळी त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी हालचाल केली असता त्याला पोलीस आल्याची कुणकुण लागली अन तो फरार होण्यात यशस्वी झाला. यावेळी अटक असलेल्या विनोद चव्हाण कडून 79 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले असून फरार आरोपी रहेमान उर्फ पवनी गफूर खान याचा शोध पोलीस घेत आहे.

यांनी केली कारवाई सदर कारवाई

पोलीस अधीक्षक संदीप घुगे , अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकूर, रवींद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजिद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भीमराव दीपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मद आमिर, लीलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top