महाशिवरात्रीला शिंगाड्याच्या पीठातून १०० हून अधिक जणांना विषबाधा

नागपुरातील धक्कादायक घटना

नागपूर : नागपुरात (Nagpur) महाशिवरात्री निमित्त उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यातील तब्बल १०० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेतले असून ते पुढील चौकशीसाठी पाठवले आहेत.

शिंगाडा पिठापासून बनविलेले अन्न पदार्थ खाल्याने या नागरिकांना उलट्या, हगवण, पोटदुखी, अंगदुखी सारखी लक्षणे आढळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्वांनी विकत घेतलेले शिंगाड्याचे पीठ एकाच कंपनीचे असून हे पीठ एक्स्पायर झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मुदत संपल्यांतरही दुकानदारांनी ते पीठ नष्ट न करता विक्री केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या नागरिकांनी ज्या दुकानांमधून हे पीठ विकत घेतले होते, त्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भाविकांनी हे शिंगाड्याचे पीठ खाल्ले, त्याची एक्स्पायरी म्हणजेच मुदत संपली होती. याच शिंगाडाच्या पिठापासून तयार केलेल्या उपवासाच्या फराळाचे पदार्थ खाल्याने नागपूर जिल्ह्यात १०० हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाली. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातल्या विविध भागांमध्ये सीलबंद शिंगाडा पिठाची विक्री करणाऱ्या एकमात्र ब्रँडमुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. घडलेल्या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. हा भेसळीचा प्रकार असल्याचा संतापही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top