मानधन तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांची मुजोरी
यवतमाळ : नेहरू क्रीडा संकुलात लाखो रुपये खर्चून सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मानधन तत्त्वावरती असलेल्या कर्मचाऱ्यांकडून या ट्रेकची देखभाल केली जात नसून त्यांच्या मूजोरीपणा वाढत आहे. दि.१७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सिंथेटिक ट्रॅकची काळजी घेण्यात आली नाही. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या ट्रॅकवर चक्क बसण्यासाठीचे टेबल ठेवण्यात आल्याने आयोजक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.त्यांच्या या कृत्यामुळे ट्रॅकची ऐशीतैशी झाल्याची चर्चा क्रीडा वर्तुळातून सुरू आहे. नेहरू क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात आली होती. त्यासाठी जपान व चीन देशातून तंत्रज्ञ बोलविण्यात आले होते. या ट्रॅकमुळे जागतिक पातळीवरील ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत भाग घेण्यासाठीचा सराव शक्य आहे. परंतु, या ट्रॅकवर आज ( ता.१७ ) १४,१७ आणि १९ वयोगटातील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांना ट्रॅकबाबत संपूर्ण माहिती असूनसुद्धा त्यांनी त्यावर टेबल ठेवले त्यामुळे ही स्पर्धा टीकेची धनी ठरली आहे. दरम्यान, मानधन तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांवर काही प्रशिक्षकांनी आक्षेप घेतला. त्यांची दादागिरी खपवून घेणार नसल्याची चर्चा स्टेडियममध्ये ऐकायला मिळाली. कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली मात्र या ट्रॅकवर निगराणी राखण्यासाठी लावलेले सीसीटिव्ही कॅमेरेही बंद असल्याचे पुढे आले आहे.
खेळाडू मुलींमध्ये असुरक्षितेची भावना.
स्पर्धेदरम्यान,खेळाडू मुली कार्यालयात जाण्यास धजावत नसल्याचे दिसून आले. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही स्पर्धा आयोजित करताना आयोजकांनी ट्रॅकचे भान जपायला हवे होते,अशी माफक अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली. मात्र,यावर वृत्त लिहिस्तोवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून संबंधितांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
