१३ नद्यांमधील पाणी पूर्णपणे आटलं

देशातील इतर नद्यांमध्ये गेल्यावर्षीहून कमी पाणीसाठा

मुंबई : यंदाच्या वर्षी तापमान (Heat) प्रचंड वाढलं असून धरणांमधील तसेच नद्यांमधील पाणीसाठा कमी (Rivers dried up) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अजून उन्हाळ्याची (Summer) केवळ सुरुवात झाली असताना देशातील १३ नद्यांमधील पाणी पूर्णपणे आटलं आहे. इतर नद्यांमध्ये गेल्यावर्षीहून कमी पाणीसाठा आहे. ही चिंतेची बाब असून यंदाचा उन्हाळा तहानेने व्याकूळ करणार आहे.

केंद्रीय जल आयोगाचा अहवाल भयावह असून हा उन्हाळा कसा जाणार, असा मोठा प्रश्न देशवासियांसमोर उभा ठाकला आहे. देशातील १३ नद्यांमधील पाणीच पूर्णपणे संपलेले आहे. तर गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधु, पेन्नार, नर्मदा, तापी, साबरमती, गोदावरी, महानदी, कावेरी यांचे पाणी गेल्या वर्षीपेक्षा वेगाने आटत चालले आहे. देशातील नद्या या जीवनवाहिन्याच नाहीत तर ट्रान्सपोर्ट आणि वीज उत्पादनासाठीही मदतगार ठरतात. या नद्यांमुळे सामाजिक आणि आर्थिक विकास होतो. आयोगाकडे देशातील अतिमहत्वाच्या अशा २० नद्यांच्या बेसिनचा लाईव्ह डेटा असतो. यापैकी १२ नद्यांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणी आहे. कावेरी, पेन्नार आणि कन्याकुमारीच्या भागातील पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांना सर्वात मोठे नुकसान झाले आहे.

भारतात एकूण नदी, तलाव अशी १५० महत्वाची जलाशये आहेत. या जलाशयांमध्ये आता ३६ टक्केच पाणी उरलेले आहे. यापैकी ८६ जलाशयांमध्ये ४० टक्के पाणी आहे. आयोगाने २८ मार्चची आकडेवारी जारी केली आहे. यापैकी सर्वाधिक जलाशये ही दक्षिणी राज्ये, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. रुशिकुल्या, वराह, बाहुदा, वंशधारा, नागावली, सारदा, तांडव, एलुरु, गुंडलकम्मा, तम्मिलेरु, मुसी, पलेरु आणि मुनेरु य़ा नद्यांचे पात्र सपशेल आटले आहे. या नद्यांद्वारे ८६,६४३ वर्ग किलोमीटर जमीन ओलिताखाली येते. IIT गांधीनगरनुसार अनेक भाग हा असाधारण दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे.

सर्वाधिक चिंता गंगा नदीमुळे…

सर्वाधिक चिंता गंगा नदीने दिली आहे. गंगेच्या खोऱ्यातील ६५ टक्के भाग हा शेतीचा आहे. ही नदी ११ राज्यांतून वाहते व काठच्या २.८६ लाख गावांमध्ये शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरविते. परंतु गंगेमध्ये क्षमतेच्या निम्म्याहून कमी पाणी आहे. गंगानदीचे पाणी आटणे हे शेतीला प्रभावित करणार आहे. नर्मदेवर ४६ टक्के शेती, तापीवर ५६, गोदावरीवर ३४ आणि महानदीवर ४९ टक्के शेत जमिन अवलंबून असते. या नद्यांचे पाणीही आटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top