
जालना – मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात उपोषण सुरू होते. अखेर मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले. या वेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. 17 दिवसांनंतर मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले असून त्यांनी दवाखान्यात दाखल होण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती देखील मान्य केली आहे. त्यानुसार मनोज जरांगे आता दवाखान्यात उपचार घेणार आहेत. मला शब्द दिलाय आज मनोज जरांगे यांनी दवाखान्यात भरती व्हायलाच हवे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. त्यावर मनोज जरांगे यांनी देखील शब्द मोडणार नसल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेमधील व्हायरल संवादावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. देवेंद्र फडणवीस मी आणि अजित पवार यांच्यात पत्रकार परिषदेबद्दल चर्चा सुरू होती. त्याचा शेंडा आणि बुडूक काढून माध्यमांनी मधले दाखवले, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. माध्यमांवर आमचा विश्वास आहे, पण त्यांनीच विश्वासघात करु नये, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी पुढील दोन ते तीन दिवस दवाखान्यात उपचार घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काही लोक इतर जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारचे पूर्ण प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. इतर समाजाने समजून घेण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाज अतिशय शिस्तप्रिय आहे. असे असताना झालेला लाठीचार्जमुळे गालबोल लागले. यात ज्यांचा दोष होता, त्यांना निलंबीत केले आहे. इतकेच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाहीर माफी मागितली आहे. घटनेबद्दल मलाही खंत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्याच मागे जनता उभी राहत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मी उपोषण सोडण्याची विनंती केली, आणि तुम्ही ती मान्य केली, या बद्दल मी आपले आभार मानत असल्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढतोय. त्याने कधीही स्वत:च्या फायद्यासाठी कोणताच प्रश्न मांडला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मनोज जरांगेला मनापासून शुभेच्छा देत अभिनंदन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जीव गेला तरी चालेल, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकारचा एक महिन्याचा प्रस्ताव होता, समाजाच्या वतीने मी दहा दिवस जास्त देतो, पण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात, असा मला विश्वास होता. असे मतही मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे वडील देखील उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना देखील ज्युस देण्यात आला.