साहित्यात दगडाचे फुल करण्याची ताकद असते- चंद्रकांत वानखेडे

अकोट– जगातील दुःखावर पांघरूण घालण्याचे काम साहित्यिक करतात. विलास ठोसर यांनी ‘खोयमोडी’ मधून मातीशी नाते जोडले आहे. अस्सल साहित्यातून माणसांच्या भावनांची जपवणूक केली जाते .दगडाचे फुलात रूपांतर करण्याची ताकद साहित्यामध्ये असते, असे प्रतिपादन प्रा चंद्रकांत वानखेडे यांनी केले.
स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात विलास ठोसर यांच्या कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदान मिळालेले आहे. फटाकेकार ॲड अनंत खेळकर यांचे हस्ते या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर, जेष्ठ साहित्यिक विजय पाटील, गुल्लेरकार नरेंद्र इंगळे, साहित्य साहित्य संकृती मडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पांडे, अंनिसचे राज्य संघटक अशोक घाटे, कॅप्टन सुनील डोबाळे, ज्येष्ठ विचारवंत शरद वानखडे, विनायकराव मोडसे, मराठी विभाग प्रमुख डॉ विलास तायडे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, अरविंद देशमुख, किशोर ठोसर, राजाभाऊ धर्माधीकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत वानखेडे पुढे म्हणाले, मानवाची तहानभूक, निवारा या गरजा भागल्यानंतर कथांची निर्मिती झाली.वऱ्हाडी भाषेत एक विशिष्ट गोडवा आहे. सर्व बोलीभाषा जपल्या गेल्या पाहिजेत. कथा लिहिणे सोपे नाही, काळजातील दुःख पचवून कथा निर्मिती केली जाते. ठोसर यांनी ते आव्हान पेलले आहे. ॲड अनंत खेळकर यांनी यावेळी बोलताना साहित्यातून जीवाभावाचे नाते जोडले जाते. हे नाते ज्याला टिकून ठेवता येते तोच मानवी मूल्यांची जपवणूक करू शकतो असे प्रतिपादन केले.
नरेंद्र इंगळे यांनी विनोदी शैलीतून साहित्य निर्मितीची प्रक्रिया विशद केली, तर विजय पाटील यांनी कथा लिहिण्यासाठी पदवी महत्त्वाची नसून समाजाचे आकलन महत्त्वाचे असते अशी भूमिका मांडली.
पुष्पराज गावंडे यांनी दर्जेदार साहित्याचा शासन निश्चितच विचार करते त्यासाठी उत्तम साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे असे मत मांडले. प्रा ग. रा. अंबळकर यांनी, कथेची बीजे आपल्या सुप्त मनात असतात, जी कथा अंतर्मुख करते तीच उत्कृष्ट कथा असते, साहित्याचा विषय माणूस असावा, परंतु अनेकांना लिहिणारा माणूस मोठा वाटत नाही अशी खंत व्यक्त केली. संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर यांनी, भाषा कोणतीही असो की काळजाला भेटली पाहिजे असे मत मांडले.
यावेळी डॉ विलास तायडे यांनी, आजवर अभ्यासक्रमात पुण्या मुंबईच्या लेखकांचे साहित्य शिकवले जायचे, आता परिस्थिती बदललेली असून परिसरातील लेखकांचे साहित्य शिकवताना विशेष आनंद होतो असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत महाजन आणि आभार प्रदर्शन संतोष विणके यांनी केले. कार्यक्रमाला साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मायबोली साहित्य प्रतिष्ठान, वऱ्हाडी कट्टा आणि श्री शिवाजी महाविद्यालययाच्या मराठी विभागातर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top