कुठलीही योग्य सुविधा नसताना विभागीय आयुक्तांची शासन विभाग प्रमुखांना नियोजनाची परवानगी

नियोजनाबद्दल विभाग प्रमुखांकडून अयोग्य उत्तरे

अमरावती/विशेष प्रतिनिधी– प्रसिद्ध शिवभक्त तथा शिवमहापुराण कथेचे प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून येत्या १५ ते २० डिसेंबर पर्यंत हनुमान गढी येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. याच आयोजना निमित्त अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अमरावती विभागाच्या संपूर्ण शासन स्तरावरील विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये संपूर्ण विभाग प्रमुखांकडून सदर नियोजनाबद्दल अयोग्य उत्तरे समोर आली असून सदर नियोजन शासन स्तरावर ढेपाळले असल्याचे समोर आले. कुठल्याही शासन विभागाकडून पूर्णत्वास आलेली एकही माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडून समोर आलेली नाही. त्यामुळे सदर नियोजनात येणार्‍या भाविकांची गैरसोय होणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा व अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा दांपत्याकडून येत्या १५ ते २० डिसेंबर पर्यंत अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरातील खाजगी जागेत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजन स्थळाची जागा खाजगी असली तरी या खाजगी जागेत त्यांनी वनकटाई केलेली आहे. यापूर्वी सदर वनकटाई केल्याबद्दल अमरावती शहरातील वन प्रेमींनी तसेच आयोजन स्थळापासून काही दूर अंतरावर असलेल्या निवासी लोकांनी सुद्धा या आयोजन स्थळाचा विरोध केला होता. मात्र तरीसुद्धा या आयोजन स्थळावरच सदर शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिवमहापुराण कथेची कलश यात्रा येत्या १५ डिसेंबर रोजी शहरातील जिल्हा स्टेडियम येथून निघणार आहे. या कलश यात्रेत अंदाजे एक ते दोन लाख महिला भगिनी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वतः आयोजकांनी वृत्तपत्रांना दिलेली आहे.

सदर शिवमहापुराण कथेचे आयोजन अमरावतीच नव्हे तर विदर्भातील ऐतिहासिक आयोजन ठरणार असल्यामुळे अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी काल अमरावती प्रशासनातील संपूर्ण विभाग प्रमुखांची बैठक ठरविली होती. यामध्ये स्वतः विभागीय आयुक्त यांच्यासह आ. रवी राणा, खा. नवनीत राणा, पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, वाहतूक पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, प्रसिद्ध समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया, मनपा आयुक्त पवार, एसटी महामंडळ चे पदाधिकारी, बीएसएनएल चे पदाधिकारी, मनपा आरोग्य विभाग, मनपा सफाई विभाग, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हाधिकारी, राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर तथा शहरातील हिंदुत्ववादी संघटना चे पदाधिकारी, सिटी बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी, फ्रेजरपूर ठाण्याचे एसीपी शिवाजी बचाटे, रेल्वेचे अधिकारी, क्रीडा अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, महावितरण विभाग, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अधिकारी, आरटीओचे अधिकारी, बडनेरा चे पोलीस निरीक्षक बाबासाहेब अवचर तथा अन्य सुरक्षारक्षक या बैठकीत उपस्थित होते. सदर बैठकीत विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी स्वच्छतेचा मुद्दा उचलला. या मुद्द्यावर चर्चा करताना आमदार रवी राणा यांनी बाराशे लोकांची स्वच्छता चमूची मागणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की सदर आयोजन स्थळी तब्बल ८० हजार लोक आयोजन स्थळाच्या पेंडॉलमध्ये निवासी आहे. त्यामुळे येथे स्वच्छता कर्मचार्‍यांची अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळे मनपा व जिल्हा परिषदेच्या समन्वयाने येथे बाराशे लोकांची चमू आम्हाला हवी आहे. यावर निधी पांडे यांनी तात्काळ जिल्हा परिषद व मनपा ने समन्वय करून त्यांना मनुष्यबळ देण्याची शिफारस केली. तर या ठिकाणी ८०००० लोकांच्या अनुषंगाने तेवढेच सुलभ शौचालय सुद्धा लागतील यावर सुद्धा भर देऊन मनपा आयुक्त यांना तशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले. काही महिन्यांपूर्वी कथावाचक ठाकूर यांचे अकोल्याला शिवमहापुराण कथेचे आयोजन झाले होते. याचाच अनुभव घेता जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की, येथील भाविकांनी जाताना मोठ्या प्रमाणात उघड्यावरच विष्टा केली होती. त्यामुळे या सदर परिसरात मोठ्या प्रमाणात डायरिया व अन्य रोगांचे प्रमाण वाढले होते.

त्यामुळे आपण स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावर आयोजकांनी बाजू मांडतांना सांगितले कि, लोकांच्या आरोग्यांच्या दृष्टिकोनातून येथे ३० डॉक्टरांची चमू व आठ रुग्णवाहिका या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच सदर परिसर हा वनपरिक्षेत्रात मोडत असल्यामुळे या ठिकाणी सर्पदंश च्या उपचारासाठी एक वेगळी टीम तयार राहणार आहे. एस टी महामंडळाच्या तर्फे अमरावती जिल्ह्यात दररोज ३८० फेर्‍या होतात. यापैकी १८० बसेसच्या फेर्‍या या शिवमहापुराण कथेच्या आयोजन स्थळासाठी वापरण्यात येणार आहे. त्यापैकी १०० बसेसचे नियोजन करण्यात आले असून परतवाडा व धारणी या गावांमध्ये तब्बल ५० बसेस भाविकांसाठी सोडण्यात येणार आहे. तसेच चुरणी अंतर्गत येणार्‍या ९० गावांमधून अन्य बसेस सोडण्यात येणार आहे. मात्र याचा फटका नागपूर व इतर जिल्ह्यांच्या फेर्‍यांवर पडणार आहे. या व्यतिरिक्त अमरावती महानगरपालिकेच्या संपूर्ण १७ सिटी बसेस आयोजकांनी आपल्या शिवमहापुराण कथेसाठी वापरणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तब्बल ६ दिवस अमरावती शहरात एकही सिटी बस धावणार नाही हे नक्की. आणी याला अमरावती महानगरपालिकेचे आयुक्तांनी या बैठकीत परवानगी दिली हे विशेष. सदर आयोजनामध्ये येणार्‍या प्रत्येक भाविकाकडे मोबाईल राहणार आहेत. त्यामुळे येथे नेटवर्क कंजेशन होण्याची शक्यता आहे. यावर संबंधित विभागाला विचारले असता, आयोजन स्थळी फक्त बीएसएनएल चीच सुविधा आहे. तर अन्य कंपन्यांची रेंज मात्र इथे राहणार नाही. आणी चार दिवसात या संपूर्ण कंपन्यांचे टॉवर उभारणे शक्य नाही असे उत्तर मिळाले. सदर आयोजनात रेल्वे विभागाकडून १० होमगार्ड ट्राफिक पोलीस तथा रेल्वे पोलीस फोर्स ची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी देखील अतिरिक्त कुमक ची गरज असल्याचे कळवले. सदर बैठकीत महावितरणच्या अधिकार्‍यांना आपल्या कार्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर आयोजन स्थळावर आम्ही पथदिवे लावू शकतो. मात्र येथे संपूर्ण वीजपुरवठा करणे शक्य नाही. दोन गावांच्या मध्ये एमएसईबी पुरवठा करू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या आयोजनासाठी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लावणे आवश्यक आहे. आणि इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला पुरवठा देता येणार नाही. असे सांगून त्यांनी असमर्थता दर्शविली. याचाच अर्थ आयोजकांकडून आतापर्यंत कार्यक्रमस्थळी वीज पुरवठा शक्य झालेला नाही. आणि जर आयोजन स्थळावर वीजपुरवठाच नाही तर तेथे भाविक राहणार कसे व कार्यक्रम कसा पार पडणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त यांनी पाणीपुरवठा संबंधित विचारले असता आयोजकांनी चक्क माळेगाव सिंचन तलावातून पाण्याची मागणी केली.

सध्या या कार्यक्रमाचे आयोजक भानखेडा येथील शिंदे यांच्या विहिरीतून पाणी घेत आहे. मात्र येत्या सहा दिवसात येणार्‍या भाविकांची गर्दी पाहून त्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी आयोजकांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व अग्निशामक यांच्याकडून टँकर पुरवठा मागितला आहे. तसेचजीवन प्राधिकरण ला माळेगाव सिंचन तलावातून पाण्याची मागणी केली असता आयोजन स्थळापासून माळेगाव सिंचन प्रकल्प एक किलोमीटर असल्यामुळे, इतक्या कमी वेळात सदर पाईपलाईन टाकण्यासाठी १५ लाख रुपये निधीची गरज भासणार आहे. तसेच फक्त ३ दिवसाच्या कालावधीत जीवन प्राधिकरण भूसंपादन करून निविदा काढून परवानगी मिळवून निविदा देऊन कंत्राटदाराकडून हे काम कसे करवून घेते हे पाहणे आवश्यक आहे. परंतु फक्त ३ दिवसाच्या कालावधीत जीवन प्राधिकरण ने सदर काम केल्यास तो एक विश्व विक्रम ठरेल हे नक्कीच. सदर कार्यक्रमात येणार्‍या भाविकांची सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अमरावती शहर पोलीस आयुक्त यांच्याकडून सदर ठिकाणी ४ मोठे टावर २ कंट्रोल रूम व १००० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोणत्याही भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर त्यांनी तात्काळ ११२ वर कॉल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी या बैठकीत दिले. सदर ऐतिहासिक आयोजनाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला लप्पीसेठ जाजोदिया यांच्या मार्गदर्शनात शहरातील जिल्हा स्टेडियम येथून अंदाजे १ ते २ लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवकलश यात्रा निघणार आहे. या अनुषंगाने क्रीडा अधिकारी जाधव यांच्याशी पाठपुरावा घेतला असता, जिल्हा स्टेडियम येथे केवळ २५ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. मात्र या ठिकाणी पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. आयोजकांनी येणार्‍या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. तसेच पार्किंगची सुद्धा व्यवस्था करावी. असे सांगितले. यावर आयोजकांतर्फे या ठिकाणी येणार्‍या भाविकांची पार्किंग व्यवस्था शिवाजी महाविद्यालय, शिवाजी बीपीएड महाविद्यालय, शिवाजी लॉ कॉलेज व गणेशदास राठी च्या प्रांगणात करण्यात आलेली आहे. तर याच दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पंचवटी ते इर्विन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक व राजापेठ चौक मार्गे फरशी स्टॉप, कव्हर नगर व दस्तूर नगर चा मार्ग एक तर्फी करण्यात आलेला आहे. अशी माहिती दिली. वि. आयुक्त निधी पांडे यांनी अमरावती शहरातील संपूर्ण विभाग प्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत सदर शिवमहापुराण कथेचे आयोजन हे ढेपाळलेले असून सध्या परिस्थितीत कुठलेही नियोजन पूर्णत्वास आलेले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरच नव्हे, विदर्भ नव्हे, तर संपूर्ण भारतातून येणार्‍या भाविकांची या कार्यक्रमात गैरसोय होणार असल्याचे कालच्या बैठकीत स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे आता या सर्व परिस्थितीत प्रश्न काय उपाययोजना करते, तसेच आयोजक किती गोष्टींची पूर्तता करतात, आणि प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी काय घडते, आणि कार्यक्रमानंतर त्याचे जंगलावर काय परिणाम होतात हे प्रत्यक्ष शंकरजींना ठाऊक असेलच.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top