…अमरावतीत कलाकार येणे बंद होतील

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहाच्या दूरवस्थेबाबत अभिनेते शरद पोंक्षे यांनी टोचले कान

अमरावती/प्रतिनिधी
उत्तम नाटक, नृत्य, संगीत ही समाजाची मुलभूत गरज असताना तसेच ते सादर करण्यासाठी सुविधायुक्त नाट्यगृह गरजेचे असताना अमरावती शहरातील ‘संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहा’च्या दूरव्यवस्थेने कळस गाठला असून येथे कला सादर करताना कोणताही अपघात होण्याची भीती अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त करीत येथील आमदार, खासदारांना केवळ मत देवू नका तर त्यांच्या मागे लागून शहरातील नाट्यगृहाची झालेली भयानक अवस्था त्यांच्या लक्षात आणून द्यावी, अन्यथा अशा रंगभुमीच्या घाणेरड्या व्यवस्थेमुळे अमरावतीत कलाकार येणे बंद होईल अशी भीती अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या प्रयोगाच्या शेवटी शरद पोंक्षे यांनी विदर्भाच्या सांस्कृतिक राजधानी मध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहाची दारूण अवस्था वर्णन केली.
अमरावती शहराची कलाक्षेत्रात ओळख असून येथून अनेक कलावंत निर्माण झाले आहेत. या कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह हे महत्त्वाचे व्यासपिठ आहे. या सभागृहात वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यकम नाट्य कलाकृती सादर होत असतात. सभागृहात नुकतेच ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते शरद पोंक्षे आले होते. यावेळी नाटकादरम्यान त्यांना रंगभुमीवरील आलेल्या अनुभवांचा पाढा त्यांनी वाचला. रंगभुमीवरील फरशी, टाईल्स इतक्या खचल्या आहेत की भूमीत जाईल का? अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सभागृहाला स्वतःची ‘साउâंड सिस्टीम’ नसणे म्हणजे लांच्छनास्पद बाब असून एखादा कलावंत मुंबईवरून ७०० ते ८०० किमीचा प्रवास करून आल्यावर व कला सादर करत असताना सभागृहाची स्वतःची साउâंड सिस्टीम नसणे व भाड्याने आणलेल्या साउâंड सिस्टीम मध्ये अनेक बिघाड होणे ही किती लाजिरवाणी अशी बाब आहे. त्याचबरोबर येथे बटणांवर उघडणारा पडदा देखील नाही. तर पडदा उघडण्याला माणसे देखील नाही. दोघेजण पडदा धरून आणतात. स्टेजवर पडलेले खिळे झाडण्यासाठी माणसेदेखील उपलब्ध नाहीत. प्रसाधनगृहाची अवस्था तर विचारूच नका. एका महिला कलाकाराला चार तास ‘वॉशरूम’ वापरण्यापासून थांबावे लागते. कारण अत्यंत घाणेरड्या प्रसाधनगृहात त्यांना जाणे शक्य नाही. येथील कलावंतांसह सहकलावंतांची देखील कुचंबणा होते. आणखीन काय दूरावस्था असावी? केवळ सांस्कृतिक राजधानी हे बिरूद लावून धन्यता माणणे बंद करायला हवे सर्वांनी एकत्रित येवून यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी आलो असताना इतकी भयावह अवस्था या रंगभूमीची नव्हती असे प्रामुख्याने त्यांनी आपल्या संवादातून स्पष्ट केले.
उत्तम नाटक समाजाची मुलभूत गरज आहे. ते नसेल तर आयुष्य भयानक होईल. अमरावतीतील रंगभुमीची ही अवस्था अशीच राहीली तर येथे कलाकार येणे बंद होतील. तुम्ही अमरावतीकरांनी येथील नाट्यपरिषद तसेच खासदार, आमदार यांना या रंगभुमीची परिस्थिती दाखवा. नुसतेच मत देवू नका. येत्या काही दिवसात ‘सई रे सई’ या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा अमरावतीत येणे होईल. तोपर्यंत तरी हे नाट्यगृह सर्वसुविधायुक्त व्हावे अशी अपेक्षा आपल्या संवादातून अभिनेते शरद पोंक्षे यांनी अमरावतीकरांपुढे व्यक्त केली.

पोक्षेंनी टोचलेले कान… त्या कानांना ऐकू जाईल का? काल “मी नाथुराम बोलतोय” या प्रयोगाच्या शेवटी शरद पोंक्षे यांवी विदर्भाच्या सांस्कृतिक राजधानीमधे असलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहाची दारुण अवस्था वर्णन केली. सांस्कृतिक चळवळी चालवायच्या असतील व त्या टिकवायच्या असतील तर खऱ्या अर्थाने आता काम करण्याची वेळ आहे. एका महिला कलाकाराला चार तास वॉशरुम वापरण्यापासून थांबावे लागते कारण अत्यंत घाणेरड्या प्रसाधनगृहात त्यांना जाणे शक्य नाही, स्टेजवर पडलेले खिळे झाडायला माणूस नाही, पडदा दोन लोक ओढतात व सर्वात महत्वाचे म्हणजे नाटकाचा आवाजच ऐकू येत नाही… आणखी काय दुरावस्था असावी? केवळ सांस्कृतिक राजधानी हे बिरुद लावून धन्यता मानणे बंद करायला हवे व राजकीय पक्ष किंवा कुणाची सत्ता वगैरे या चर्चा/आरोप/प्रत्यारोपापेक्षा (कारण त्याच्यातच वेळ जातो व तोडगा निघत नाही) सर्वांनी एकत्रित येऊन लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे… (कुणी काम केले याच्या श्रेयाची काळजी न करता कारण ती स्पर्धा फार असते) काही कामे श्रेयापेक्षा गावासाठी केली जातात त्यातील हे काम आहे… रंगमंचावर वावरताना आपण स्टेजच्या आत पडून जाऊ अशी भिती अभिनेत्यांना वाटत असेल तर आपले काहीतरी चुकतेय.. नाव कोणते द्यायचे किंवा पुतळे कुणाचे उभारायचे यापेक्षा सुविधा कश्या आहेत ते फार महत्वाचे.. होय ना?
डॉ अविनाश मोहरील,
अमरावती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top